Friday, December 16, 2011

शक्य नाही


विसरावे म्हणून विसरणे आता शक्य नाही
सहज जाता जाता नवे बंध बांधणे मान्य नाही 

तुझी आठवण न येत क्षणही जाणे शक्य नाही 
दुसर्या कुणात तुझे प्रतिबिंब पाहणे रुचत नाही 

शिडाचे जहाज होवून वाऱ्यावर झोकणे शक्य नाही 
आठवणींची तुझी सावली, नाकारणे जमणार नाही    

तुटले कितीही तरी चंदन गंध ढाळणे शक्य नाही 
उपर्याने तुझा हक्क नाकारणे आता खपणार नाही 

पाऊस जसा धरेवर न बरसणे शक्य नाही 
तु समोर असताना पाझर न फुटणे शक्य नाही 

विसरावे म्हणून विसरणे आता शक्य नाही
तुझ्या आठवणीनविना जगण्याची कल्पनाही शक्य नाही 

तेजश्री 
१६.१२.२०११ 

Sunday, December 11, 2011

आठवण


रोज रातीला निखळ 
चंद्र येतो जातो 
आठवणींचे नव वादळ 
तेवढ सोडून जातो 

रोज पहाटे तरंग 
अचल पाण्यावर उमटतात 
ते प्रत्येक प्रसंग 
फेर धरत अंगावर येतात 

रोज दिवसा आभाळ 
काळी शाल पांघरून येत
आठवणी भूतकाळ 
होण्याची भीती दाटवून जात 

तेजश्री 
११.१२.२०११ 

Friday, December 9, 2011

प्रायश्चित्त


बेभान सुटलेला बोचरा वारा 
आधीच जगाच्या  बोचत्या  नजरा 
गरज तेव्हा मला होती, तुझ्या आधाराची, 
तुझ्या संरक्षणाची, मायेची, उबेची  
सार विसरण खुप अवघड होत माझ्यासाठी 
भविष्य गाठण्यापायी भूतकाळा टाकणे पाठी 
तुझ्या आधाराची अपेक्षा मी कधी व्यक्त केली नाही 
तु मात्र क्षणोक्षणी दर्शवलीस त्याची खंतही 
पण माझी भूमिका तु नाहीच समजून घेतली  
तुला मी गृहीत धरण्याची फार मोठी चूक केली 
शेवट पर्यंत तुला समजण्यासाठी मी धडपडत होते 
झिजत होते,  क्षणोक्षणी हजारदा पडत होते 
लग्नबंधनात बद्धताना आशा नवल औस्तुक्य होते 
हळुवार उलगडणारे नियतीचे रसाळ कोडे वाटले होते 
संसार एक दलदल, खोल पाय ओढणारी 
खोल खोल गेल्यावरही तोल ढाळणारी 
जून होईतो चविष्ट होणाऱ्या दारूचेही दाखले ऐकले 
अखेर दारूच भिनली, शरीरभर रक्ताचे विष झाले 
आता काळजी नको करू, जगेन मी कशीही, निराधार! 
कारण आता मी गेले आहे जन्म मृत्युच्या पार 
आता समोरचा वणवा पोटात आग पाडतच नाही 
डोळ्यांदेखतचा महासंग्राम घायाळ करतच नाही 
हळवी कळी तु उमलायाच्या आधीच तोडलीस 
आता नियतीच्या शिक्षेच वावग नको वाटून घेउस 
तुझ्या यातना माझ्या हृदयापर्यंत पोहोचतच नाहीत 
निब्बर आतड्याला आणखीन पिळ आता पडतच नाहीत 
तू तुझे निर्णय घ्यायला मोकळा होतास आणि असशील 
प्रायश्चित्ताचे किमान नाटक तर न करशील 

तेजश्री
१०.१२.२०११  

Monday, December 5, 2011

गरज


बिलगून बसलेला दवबिंदू गवताच्या पात्यावर
अगदी घट्ट पकड, मनात दाटलेलं एकच काहूर 

छप्पर गमावण्याच्या भीतीत स्पष्ट तराळलेली नजर 
निरागस, अस्वस्थ मनाची एकसंध अशी थरथर  

धुंद होती जरी हवा, सापडला नाही घोटवलेला सूर 
स्वप्न दुनियेची जरी, शाश्वती नाही येणे बेचैनपुर 

जरी गरज दवालाच एकमार्गी भासे वरचेवर
बिन्दुशिवायचं जीवन जणू मीठ घातलेल क्षीर 

एकमेकांसंगे  भागवण्याचा  गरजेचा निर्धार 
एकमेकांशिवायच मात्र अस्तित्व शून्य निराधार 

हिरव्या हिरव्या गवताचे पाठी हात खंबीर   
प्रेम, विश्वासाची देवाणघेवाण देते एकमेका धीर 

तेजश्री 
५.१२.२०११ 

Sunday, November 13, 2011

उन


हिरवी झाडं आज झाली उन उन 
झाडात झंकारली पाखराची धुन 

निळे कपाशी मेघ झाले आज उन उन 
ढगापाठी पाऊसही लपला उन होवून 

गुलाबी थंडीत स्पर्श तुझा उन उन 
स्पर्षातला कापरा भाव आलारे कोठून? 

डोळे अन्यथा जिवंत, जाहले आज शुष्क उन 
वेचले दृष्टीआडचे अश्रु, न पाझरले नयनातून 

नको सख्यारे विचार आणूस का पावसानंतर येई उन?   
नविन दिशा सापडत असते तुटलेल्याच स्वप्नातून........  

तेजश्री 
१३.११.२०११ 

Wednesday, November 9, 2011

कवडसा


उन्ह कवडसा खेळे 
कौलारू घरदार 
रेंगाळला त्याचा
तो स्पर्षं उबदार 

कैक दिसांनी रमे 
तान्हुला दिनभर 
पायापासून कळस 
गाठे सरसर 

जुळला कवडश्याचा
कौलासंगे सूर 
बोचऱ्या थंडीचे सल 
गेल उडून भूर 

खुलला तांबडा 
कौलाचा वर्ण  
पूरक कवड्याचा
रंग सुवर्ण 

कौल- कवडश्याच 
जुळल सुत न्यार 
निर्लेप मैत्रीच 
नात प्यार

तेजश्री
१०.११.२०११  

Thursday, October 13, 2011

पाऊस पडून गेल्यावर


पाऊस पडून गेल्यावर, तरतरली तृणपात 
झटकून दिली साचलेल्या मरगळीची कात 

पाऊस पडून गेल्यावर, कपाशी ढगाचा थाट 
सुवर्णकिरीट धारी मेघाची आगळीच  बात 

पाऊस पडून गेल्यावर, मृदगंध गेला गगनात 
गगनाच्या सजावटीला उधळले रंग सात 

पाऊस पडून गेल्यावर, चिंबलेली पाऊलवाट 
गाठू पाहते खुळी पावसाला पुन्हा क्षितिजात 

पाऊस पडून गेल्यावर, संपत आलेली रात 
रंगली ती हौशी सांडेतो चांदणे अंगणात 

पाऊस पडून गेल्यावर, पक्ष्यांचा किलबिलाट 
आळवती सप्त स्वर, साठवले थेंबाथेंबात  

पाऊस पडून गेल्यावर, आठवणींच्या गर्तात 
गढून गेलेली एक मुग्ध, सात्विक पहाट 


तेजश्री
१४.१0.२०११ 

Tuesday, October 4, 2011

शब्द


अनाहूत शब्दाला कुठली किनार भावनेची  
दाटलेल्या पाण्याला पकड काजळ रेषेची 

कधी सहज शब्द बरेच काही बोलून जाती 
बोचणाऱ्या अर्थाची त्यांना नसते भीती 

अश्रूंनी काजळरेष तोडल्याची नाही तमा साधी  
काळा डाग लागला तरी नाही वाटत अपराधी 

वारंवार काढली खपली तर जखमा भळभळती 
नकळतचे घाव ठेवी व्रण कायमचाच मनावरती 

शब्द असे सामर्थ्य भात्यामधला अंतिम शर 
घोट नरडीचा घेई  सुटला इच्छा डावलून जर 

जपून वापरावे असे हे शस्त्र खात्रीचे आहे जरी 
दुःख देण्यास पुरे आहे काट्याएवढे लहानगे तरी 

तेजश्री 
३.१०.२०११ 

Saturday, October 1, 2011

पाऊसाची मिठी

आज माझ्या अंगणी 
पाऊस आला होता 
तुझ्या नसण्याची 
कमी पूर्ण करायला 

पावसाची मिठी 
तितकीच आश्वासक 
अगदी तुझ्या मिठीची 
आठवण करून द्यायला 

घट्ट छातीपाशी धरत 
त्यानी माझे ठोके ऐकले
अगदी हुबेहूब तसेच 
जसे तुच  ऐकायला 

त्यानी स्वतःत सामावून 
घेतले डोळा पाणी 
स्व अस्तित्व लावले
संपूर्ण विसरायला 

पाऊस माझ्या पदराशी 
चाळे करत होता 
अगदी तसाच जणू 
तु लहानांगत खेळायला 
 
पाउसातला पाऊस आज 
राहिला नव्हता 
जसा तु माझ्याहून 
नाहीसच वेगळा 

तेजश्री
०१.१०.२०११ 

Friday, September 23, 2011

गुपित


वाटे मला कितीदा, सगळे तुला सांगावे 
गुपित राखले जुने ते, तुझ्या पुढे उघडावे 

सांगावयाचे होते, ह्या आधीच तुला ते 
कसे ते सांगावे? काहीच समजत नव्हते 

भीती ऊरात होती, तुला गमावण्याची 
मित्रत्वाच नातेही, क्षणात संपण्याची 

अवघड किती असे हे, गुपित पोटी राहणे 
तुझ्या विश्वासाला, क्षणोक्षणी जपणे 

विश्वासाला जपूनदेखील, मान होता राखायाचा 
नव्हता अपमान तुझा, तुझ्याच नजरेत करायचा 

नाहीच कळले मैत्रीचे नाते कधी प्रेमात बदलणे
प्रेमाच्या पावतीला मागणीचे नवखे नसणे 

एका डोळ्यात स्वप्ने साठवून उद्याची 
दुसऱ्या डोळ्यात मात्र सावली अश्रुंची  

मन नव्हते तयार नकार तुला द्यावयाला 
बहाणे कितीक केले मागणी टाळण्याला

भास तयार केला तिसरा कोन प्रेमाला  
तुझ्याहून श्रेष्ठ तो उत्तम जीवन साथीला 

सहन नाही होत आता तुझ्याशी खोटे बोलणे 
नाही राहवत आता गुपित पोटी जपणे 

नसेन सोबती मी, जीवनी तुझ्याच संगे 
मन आता माझे ईश्वरचरणीच दंगे 

काळाचे आग्रहाचे मला आता बोलावणे 
आता नाहीच शक्य कुठलेच मार्ग टाळणे 

काही दिनाची सोबत उरी साठवूनी घे तु 
काळाच्या परीक्षेला निर्धाराने सामोरा जा तु 

असेल सत्व परीक्षा जरी ही जीवनाची 
नकोस हरू जिद्द असशील जरी एकटाची   

साठवली आठवणीची, ही पिसे जन्मभराची  
जागी ते ठेवतील साक्ष त्या सर्व क्षणांची 
 
शाल उबेची विणली मी त्याच पिसांची 
आज सुफुर्त करते निशाणी अखेरची 


तेजश्री 
२४.०९.२०११ 
 

Monday, August 29, 2011

अंगणी सडा आज


प्राजक्ताचा सडा आज अंगणी सजला 
केशरी रंगाने श्वेत वर्ण तो खुलला   

पावसाचा सडा आज अंगणी भिजला 
थेंबात मिसळत मृदगंध दरवळला 

चिंचपानाचा सडा आज अंगणी पडला 
नाजूक पानांची नक्षी रेखाटून राहिला 

चांदव्याचा सडा आज अंगणी पडला 
निशब्द रातीला हसवून तो गेला 

तेजश्री 
२९.०८.२०११ 

Sunday, August 14, 2011

चांदवा

moon rainचंद्र देखणा भिजलेला 
उभा ढगांच्या पल्याड 
प्रीतीचा उधळे प्रकाश 
फाडून मेघ कवाड

चांदव्याचा प्रकाश करे 
योजनेयोजने प्रवास   
शुभ्र टपोऱ्या जुईचा 
द्विगुणीत होई सुवास 

नहालेल्या पानांची करे 
चांदवा छेडछाड 
अटकावती, लटके रुसती 
चांदव्यावरती द्वाड

राजी झाली अखेर 
नंतर महतप्रयास 
रेंगाळला मग भवती 
प्रीतीचा सुगंधी वास 

तेजश्री 
१४.०८.२०११ 

Saturday, July 23, 2011

पाऊस

काळ सावळ आकाश भवताली पसरलेलं
नुकतच चिंब पाऊसात न्हाहून निघालेलं  

गोमट्या चान्दव्याचा प्रकाश विखुरलेला 
सागरलाटेला चुंबण्यास अधिरलेला  

झुळूक आता वाऱ्याच्या मिठीत विसावली 
निश्चल राती अलगत गंधाची कुपी उघडली 

ऋतू जुनाच असून नव्याने सापडला 
पाऊस आला, अन हरवला सूर देऊन गेला 

तेजश्री 

Saturday, July 2, 2011

पाऊस पाऊस

श्रावण आला संगे पाऊस पाऊस 
अंगणी सडा आज पाऊस पाऊस 

मुग्ध धारा झाल्या पाऊस पाऊस 
झुंजार वारा आज पाऊस पाऊस 

उन्हाशी लपंडाव खेळे पाऊस पाऊस
डबक्याशी चाळे आज पाऊस पाऊस  

मोत्याने महडली पाने, पाऊस पाऊस 
चिंब नहाली झाडे आज पाऊस पाऊस 

मायेचा ओलावा घेऊन पाऊस पाऊस 
पाऊसात पाऊसच आज पाऊस पाऊस 

तेजश्री 

Saturday, May 28, 2011

तुजविन


तुजविन काय सांगू 
किंमत आयुष्याची 
तुजविन जीवन जणू 
मूर्ती पाषाणाची 

शब्द असून जिथे 
कमी आहे अर्थाची 
रेष बदलून मुखावरली 
उणीव जिथे भावाची 

पाकळ्या असून एका देठी 
पूर्णता नाही जिथे फुलाची 
जरी कस्तुरी असून  उदरी 
कमीच जिथे गंधाची 

तुजविन श्वास आहे 
कमी मात्र प्राणाची 
कल्पनाच करवत नाही
तुजविन जगण्याची 


तेजश्री 

Sunday, May 15, 2011

व्यवहारी


सारे जग भोवती व्यवहारी 
सारे जीवनसोबती व्यवहारी 

जन्म दिलेली धरती व्यवहारी 
पायाखालची माती व्यवहारी 

मोर आताशा नाचती व्यवहारी 
कोकीळ आता गाती व्यवहारी 

फुले देखील फुलती व्यवहारी 
पाखरे नभी उडती व्यवहारी 

ढग आकाशी दाटती व्यवहारी 
पाणीसुद्धा वाहती व्यवहारी 

उरली अवघी नाती व्यवहारी 
प्रेमही आता नुसती व्यवहारी 

त्रिकाळी ऋतू धावती व्यवहारी
श्वास शेवटचा व्यवहारी व्यवहारी 

तेजश्री 

चढाओढ


दूरपर्यंत पसरलेलं पोरक माळरान 
तोडीस तोड काळमिट्ट आभाळ 

क्षितिजस्पर्षाची स्पर्धा दोघात 
कोण कुणावर करणार मात

कधी वाटे रान पुढे पळते 
कधी आभाळ पुढे भासते 

आभाळाचे दिशादर्शक तारे
रानाला मिणमिणते काजवे 

अजून निकाल लागला नाही 
ह्या चढाओढीला शेवटच नाही?

काही चढाओढी असतात नाही का हो अश्या 
जिंकण्यापेक्षाही पळण्यातला आनंदासाठीच खेळलेल्या .........

तेजश्री 
१३.०५.२०११  

Saturday, April 30, 2011

चक्र

वाळलेलं झाडं कुणाला आवडत?
पिकलेल पान कुणाला भावत?

झाडं बहरण्याआधी वाळावच लागत
नवांकुराधी पोक्त पानाला गळावच लागत

वसंतानंदासाठी शिशिरानी यायचच
सुख चाखण्याआधी दुःख चाटायचच

अमृतानुभवासाठी स्वर्ग गाठायचाच
सागरभेटीपायी सरीतेने ठेचा खायच्याच

आयुष्य एक रेशमी वस्त्र, सुखाच गुंफलेल
दुःखाच्या वेलबुट्टीशिवाय न उठावलेल

एकमेकांचा पाठलाख सुख दुःख करत
नियतीच चक्र न दमता फिरत


तेजश्री

Monday, April 25, 2011

एक क्षण

एक मोहक्षण आयुष्य उध्वस्त करण्यासाठी
एक उपरती वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी
एक चूक आयुष्य पालटण्यासाठी
एक थाप नव्यान उभ राहण्यासाठी
एक नेत्रपल्लवी प्रेम उमगण्यासाठी
एक तिळ प्रेम वाढवण्यासाठी
एक हात आधार देण्यासाठी
एक शब्द विश्वास जिंकण्यासाठी
एक आर्त हाक माघारी बोलावण्यासाठी
एक जिद्द स्वप्नपूर्तीसाठी
एक क्षण पुरा असतो बदलासाठी

तेजश्री

Wednesday, April 6, 2011

मैत्रीचे रोपटे


आयुष्याच्या वळणावळणावर मैत्रीबीज पेरले 
मायेची घालून माती आपुलकीचे जल शिंपले

प्रेमाचा ओलावा जेव्हा  बीजाला मिळाला 
आपसूकच त्यास अंकुर फुटला 

हळू हळू रोपटे मग मोठे झाले 
हा हा म्हणता चांगलेच फोफावले 

आयुष्याची बाग आज रसाळ फळांनी भरली 
फळांची मधुर चव कायमच रेंगाळली 

प्रेम आपुलकीची फळे भरभरून मिळाली 
माझी झोळी मात्र ओझ्याने फाटूनच गेली 

दाण्यादाण्यावर खाणारयाच नाव असत कोरलेल 
आणि ही फळ चाखण्याच माझ भाग्य ठरलेलं 

माझ्या भाग्यातल्या फळांबद्दल आभारी मी राहीन 
मायेची भूक भागल्याच्या समाधानात जगीन 

आभार मानू तरी कुणाचे ?
फळ निर्माण करणाऱ्या विधात्याचे ?
का फळ देणारया झाडाचे ?

तेजश्री 

Friday, April 1, 2011

विचार


विचारांचा हलकल्लोळ माजलेला, एका मागून एक येणारे न थांबणारे विचार. हे का येतात? कुठून येतात? आणि मग क्षणभर थांबून कुठे जातात? विचारात मी कुठे रमते?  सुप्तमनातले हे विचार कधी बोचरे तर कधी सुखद असतात, एका मागून एक विचार पुन्हा पहिलाच विचार....विचारांचं एक आवर्तन पूर्ण होत खर पण पूर्णत्वाला जातात का हे विचार? त्यातून अपेक्षित उत्तर मिळते का?  ह्याच विचारांवरची एक कविता... 

क्षणोक्षण काढतात विचार हे शतकी धावा 
कुठून येती कोठे जाती क्षणचा नाही उसावा
कुणा अन का छळावे नसते त्यांना परवा 

विचार वेडे भूतकाळाचे आठवणींचा गोड विसावा 
विचार चालू वर्तमानाचे अनुभवाचा उत्तम ठेवा 
विचार न जन्मल्या दिनाचे कुतूहल ते खुळ्या जिवा

विचार स्थळ वा प्रिय व्यक्तीचे हास्याचा वदनी फुलवा 
विचार अप्रिय प्रसंगाचे दाटून येतो मनी रुसवा 
विचार अखंड जरी चालले मेंदूला तो अद्भुत मेवा 

विचार भीती नैराश्याचे आणती मनी दुःखाचा फुगवा
विचार इच्छित घटनेचे मोहरून टाकतो जणू गारवा 
विचार माफी मागण्याचा, रुखरुखतेचा मनी छळवा 

विचारांचे अखंड मंथन पूर्ण  करती एक गोलावा 
होऊन जरी तो एक फेरा जाती का ते पुर्णत्वा
विचार होती प्रगल्भ तेव्हाच होतो त्यांचा देवा घेवा 


तेजश्री 

Wednesday, March 23, 2011

चारोळी


नकोस देऊ मागाहून सांत्वनाची थाप 
सांत्वनाने अश्रुमालेस राहत नाही माप 
अश्रुंचे मग मूल्य न राही, होई एक थट्टा  
एका चुकीने आयुष्यावर कायमचाच बट्टा 

तेजश्री 

Sunday, March 20, 2011

अश्रु


अश्रुंची माळ फुले आज माळली गळी
विश्वासाची माती पायाखालून सरकली 

मान द्यावा घ्यावा साधी जनरीत ऐशी 
तुझ माझ करताना मन ते दुखावशी 

हातातली गोष्ट अधिकाराने हिरावली 
लहान म्हणून पुन्हांदा नीच जागा दाखवली

हक्काच असूनही हक्क सोडून द्यायचा?
राग कितीही आलातरी शब्द नाही चढवायचा

अश्रु अमूल्य असती वाटती असेच होते 
अमुल्याचे मूल्य मातीतच असते?

विचार सारे खुंटले, मन सैरभैर झाले 
समाधानाचे दोन क्षण अश्रूत वाहून गेले

तेजश्री 

Friday, March 11, 2011

अस्तित्व


शब्द शब्दात घुमले 
शब्द अर्थहीन भटकले 

रक्त रक्तात उसळले 
रक्त नात्यात रोखले   

नाती नात्यात गुंफली  
जन्मतः बेडीत फसली 

फांदी फांदीत गुंतली 
एका खोडाला धरून राहिली  

रंग रंगात मिसळले 
स्व अस्तित्व विसरले

- तेजश्री 

Saturday, March 5, 2011

एक भावना कायमच दाटलेली


एक हाक शांततेची 
एक नजर अंधाराची 
एक उंची पर्वताची 
एक भीती कायमच दाटलेली 

एक थाप विश्वासाची 
एक ओढ प्रेमाची 
एक वृत्ती मदतीची 
एक आशा कायमच दाटलेली 

एक सजा एकलेपणाची 
एक हुरहूर अपराधीपणाची 
एक लाज कमीपणाची 
एक कुणकुण कायमच दाटलेली 

एक मजा अनुभवाची 
एक आस सुखाची 
एक भाषा जाणिवेची 
एक सुखद भावना कायमच दाटलेली 

तेजश्री 

Tuesday, March 1, 2011

नाती


आयुष्याच्या वळणा वळणावर भेटतात नाती अनेक 
सुख दुःखाची चाहूल घेत टिकतात मोजकीच नेक 

एक हात सोडून दुसरा हात आपण धरतो खरा 
नव्या हातातला विश्वास मात्र अनुभवावा कसा बरा  

एकदाचा अनुभव पुन्हांदा येईलच असं नक्कीच नसत 
तोंड भाजल की मात्र ताक फुंकरून पिण्यात काय वावग असत 

पण काही नाती अशीही असतात 
निस्वार्थी, प्रेमळ हवीहवीशी वाटतात 

अनपेक्षितही नसताना जिव्हाळा देतात 
आवश्यकतेपेक्षा जास्त माया लावतात  

अचानक लांबची नाती खुप जवळची होतात 
चार भेटीतच जन्मोन जन्माची ओळख दाखवतात 

जन्मभराची नाती मात्र क्षणार्धात तुटतात 
एका शब्दाने किती परकेपणा आणतात 

प्रेम, जिव्हाळा, माया पावलो पावली लाभते 
ते जाणवण्यासाठी मात्र नजर नितळ साफ लागते 

आजपर्यंत खुप प्रेमळ माणस भेटली 
वेगवेगळ्या नात्याने सामोरी आली 

खुप मिळाला जिव्हाळा, खुप लाभली माया 
ऋणी राहीन मी कायमच लाभूदेत अशीच प्रेमछाया  

तेजश्री 

Saturday, February 26, 2011

श्वास


पानाचा झाडात
माश्याचा पाण्यात 
फुलाचा देठात 
आईचा पिलात
नदीचा सागरात 
माउलीचा विठलात 
पृथ्वीचा सूर्यात 
अंधाराचा प्रकाशात 
माझा तुझ्यात 
अडकलाय श्वास अडकलाय 

तेजश्री 

Monday, February 21, 2011

सहवास


शब्द नको
अर्थ नको 
लाभूदेत फक्त सहवास

प्रश्न नको
उत्तर नको
अनभवूदेत तुझा श्वास

शंका नको 
स्पष्टीकरण नको 
हवा फक्त विश्वास 

दुभाजक नको
फाटे नको 
एकसंध व्हावा सहप्रवास 

तेजश्री 

Friday, February 18, 2011

प्रेम


प्रेम असावं पाऊसासारख दृढ मिठीत येणारं
प्रेम असावं वाऱ्यासारख सुखद गारवा देणारं
प्रेम असावं फुलासारखं स्वतःच्या धुंदीत डोलणार 
प्रेम असावं पक्षासारख धुंद हवेवर झोकून दिलेलं 
प्रेम असावं झाडासारख धीरगंभीर पाय रोवलेल 
प्रेम असावं कस हे शब्दापेक्षा अनुभवानीच कळाव 
प्रत्येकानेच एकदा तरी आयुष्यात प्रेम करून पहावं
प्रेमातच जन्माव प्रेमातच जगावं 
प्रेमाच्या जोडीला फक्त प्रेमच असावं
तेजश्री 

दान

न मागताच दिलस इतक, आकाशही खाली झुकलं
न सांगता केलस सार, प्रतिबिंबही लाजलं

समजुतीने घेतलं म्हणून, सारच सोप्प झालं
आपुलकीनी जाणलस म्हणून गोडीगुलाबित सवरलं

दुनिया सारी गोल गोल नुसतीच फिरत राहिली
एक इच्छा पूर्ण करता दुसरी मात्र अर्धवट राहिली

जगाकडून अपेक्षा करण मी केव्हाचच सोडून दिल
तुझ्याकडून मिळालेल्या अनपेक्षित दानानी मात्र समाधान मिळाल

तेजश्री

Sunday, February 6, 2011

शब्दांचे अर्थ


हळव्या कळीचे शब्द भासे दलाला पोरके  
शब्दात दडला अर्थ काही न केल्या उमगे 

कोवळ्या पानाला आज कैक अठ्यांनी घेरले 
अजाणत्या वयात का हे पोक्त पण लाभले 

रातीचा चंद्र तरुण, निश्चल अबोल भ्रमला 
ध्येयशून्य भ्रमंतीत सारे जीवन का बुडाला 

वृद्ध आकाश अचल उबेची शाल गुरफटले 
लाभलीच नाही त्यास कितीही मनी चिंतले 

शब्द आणि अर्थ म्हणजे दोन किनारे लांब ते 
वाटे जेथे भेटतील अचूक, नेमके तेथेच दुरावते 
 
तेजश्री 

Friday, February 4, 2011

हे अस किती दिवस चालायचं?


सगळ विसरून मीच का जायचं 
मीच का नेहमी पुढे येऊन बोलायचं? 
हे अस किती दिवस चालायचं? 

त्यान निव्वांत कट्यावरती बसून राहायचं 
आणि मीच का मात्र हजार शंकांनी फिरायचं 
हे अस किती दिवस चालायचं? 

त्यान केलेल्या सवालांना मी नम्रतेने उत्तरायच 
आणि माझ्या प्रश्नांना मात्र विटी दांडू प्रमाणे उडवायचं 
हे अस किती दिवस चालायचं? 

नेहमी समजूतदार मीच का व्ह्यायचं?
लहान असून मोठे झाल्याच का भासवायच 
हे अस किती दिवस चालायचं? 

ताणल की तुटेल भीतीने मीच का सैल करायचं 
दुसऱ्या टोकाने मात्र ताण ताण का ताणायचं 
हे अस किती दिवस चालायचं?   

दरवेळीच मी अपमानित का व्ह्यायचं 
दरवेळीच मुग गिळून का गप्प बसायचं
हे अस किती दिवस चालायचं? 

भावनांना फक्त त्याच्याच का जपायचं 
माणूस म्हणूनच स्वतःला का डावलायच 
हे अस किती दिवस चालायचं? 
- तेजश्री 

Sunday, January 30, 2011

सामोरी तू असता


सामोरी तू असता कळी फुलही खुलते 
सामोरी तू असता दव हलकेच उतरते 

सामोरी तू असता विश्वास मरव्याचा दरवळतो 
सामोरी तू असता बाज शब्दांचा सहजवतो  

सामोरी तू असता मंजुळ पावा वाजतो 
सामोरी तू असता हिरवा डोंगर नटतो 

सामोरी तू असता धबधबा कोसळतो 
सामोरी तू असता मल्हार रंगतो 

सामोरी तू असता भानही हरवते 
सामोरी तू असता ओंजळही रिती पडते!

- तेजश्री 

Friday, January 28, 2011

हुरहूर


बोलायचं खुप काही,
सांगायचं अजून काही 
पण आभाळ दाटून आलय 

समजवायचं तुला काही, 
समजून घ्याचय मलाही काही 
पण मन वेड भरून आलय 

समजवायचं जरी काही
शब्दच अपुरे पडता आहेत 
आभाळाला पाणी साठवायला 
ढगच कमी पडता आहेत 

किती बर झालं असत जर 
काही न बोलताही सगळ तुला कळल असत
किती बर झालं असत जर 
काहीच न सांगता सार तुला उमगल असत

मी आधीच बोलणार नाही
बोलले तर अर्जवता नाही 
मला अस म्हणायच नव्हत 
अस शंभरदा म्हणणार 
मनात नसतानाही उगा तुला 
शब्द माझे घायाळ करणार 

शब्दांची जखम भरण्यासाठीही 
कोणते मलम लावणार 
समजूत तुझी काढण्यासाठी 
हुरहूर मनी दाटणार 

शब्दांचे अश्रू गाली हळू खाली आले
मर्यादेची काजळरेष उलंघून ओघळले 
भावनेचा बांध अचानकच तुटला 
डागाळलेला एक ढग भसकन फुटला 

हुरहूर मनात दाटून राहिली 
ह्याची नाही की शब्दांची पुंजी कमी पडली 
पण ह्याची की भावना पोहचवायला प्रीत माझी कमीच पडली.... 

तेजश्री

Monday, January 17, 2011

फुलचुखी

सुंदर साजिरी, गोड गोजिरी फुलचुखी ती खेळत होती 
फुलाफुलांवर रम्य बागडत, मध चोखत ती फिरत होती 

लाल निळे हिरवे पिवळे असंख्य ताटवे फुलांचे पसरले 
इकडे धाऊ की तिकडे धाऊ मन वेडीचे गोंधळून गेले 

रंग चकाकती रोज खुणावती अल्लड मन ते खेचून घेती 
पराग कण जे वाहूननेण्या माध्यम तिचे ते करून घेती 

वास दरवळे जिकडे तिकडे आकर्षण ते सदाच वाटे 
ओढ त्या गंधाची इतुकी की आपोआप पाऊल अडते 

भिरभिर भिंगरी पाया बांधली, अस्थिर मन अखंड फिरले 
जीव इवला असूनदेखील पंख फडफडताना मन ना कचरले 

उत्साही अशी फुलचुखी मनसोक्त जेव्हा खेळे 
मन माझेदेखील लहानाहून लहान झाले 

तेजश्री 

Sunday, January 16, 2011

तू

तुझा एक कटाक्ष, खिळलेला विश्वास 
तुझा एक गंध, दरवळलेली आस
तुझा एक स्पर्श, मिलनाचा ध्यास 
तुझा एक शब्द, प्रेमाचा खास 
तुझा एक भास, रोखणारा श्वास  
तुझा एक आधार, जीवनाचा प्रवास 
- तेजश्री 

Thursday, January 13, 2011

नसता निकटी तू

नसता निकटी तू जेव्हा जीव हा हुरहुरतो 
शब्द दाटुनी येती अन अर्थ वेगळा वाटतो 

अश्रू डोळ्यात दोन ह्या हलकेच उमटती 
तुझ्यावरल्या प्रितीची शाश्वती देऊनी जाती 

विचार तुझेच सख्या रे श्वासाश्वासात अडकले 
लावती जीवाला घोर मन वेडे का गुंतले 

बचैन करते उत्कट ओढ तुझी ह्या मनी 
नाजूक नात्याची जवळीक स्फुंदते नयनी 

भास तुझा अन श्वास तुझा अखंड दरवळतो 
नसता निकटी तू जेव्हा जीव हा हुरहुरतो !!!!!!

तेजश्री 

Wednesday, January 12, 2011

न उलगडणारी कोडी...

आयुष्यातली कोडी सुटणार कधी?
एक सुटता दुसरी राहणारच का उभी?

अचानक एकदम समोर येऊन उभी का ठाकतात 
अपेक्षित पण नसलेले सवाल कसे उठवतात?

कशी उत्तर सापडणार कशी सापडवणार 
नियतीच्या मनातल कधी उमगणार?

करायला जाव एक आणि होणार मात्र भलतच
एकात एक अडकलेल लांबलचक जाळ  

कुठे लांबवर सुरु झालं, कुठवर पसरलं?
एकात एक अस ते कस आणि कधी गुंफल?

आपल्या इच्छांचे आपणच नाही धनी?
पत्ताच लागत नाही नियतीच्या काय मनी?

जीवन म्हणजे आहे नक्कीच एक औत्सुक्य 
समाधानी तरी असेल का उलगडतना ते रहस्य?

कसा आणि कुठे ह्याचा शेवट होणार 
भविष्याचा थांगपत्ता कसा लागणार 

अस म्हणतात भविष्यातल्या गोष्टींची लागते कधीकधी चुणूक 
तर मग मनापेक्षा बुद्धीला अधिक कौल देण्याची करायची का चूक?

काय चूक काय बरोबर कस बर ठरवणार 
सत्यता पडताळण्यासाठी कोणती परीक्षा घेणार 

जीवन म्हणजे भूलभुलय्या केवढा मोठा 
सुटला नाहीतर भावनांचा केवढा तो गुंता 

अक्रोशणाऱ्या मनाला कस अन कुठवर समजवायचं 
बेभान विचारांना कस बद्ध करायचं 

जीवनातल्या वाटेवरले काटेरी प्रश्न हजार 
रक्तबंबाळ होऊन थिजलेले असंख्य विचार 

एकच आशा वाटते मला आता 
आजच्या कोड्याचा उद्या तरी लागुदेत पत्ता 

ह्या प्रश्नांना सध्यातरी पूर्णविराम द्यावासा वाटतो 
नियतीचा प्रश्न नियतीलाच सोडवावयास द्यावासा वाटतो!

तेजश्री 

Thursday, January 6, 2011

मुखवटे

मुखवटे हसरे रडू मनात दाबलेले 
मुखवटे प्रसन्न वास्तवात कोमेजलेले 
मुखवटे शूरवीर प्रत्यक्षात खूप बिथरलेले 
मुखवटे समजूतदार खरतर शंकांनी दाटलेले 
मुखवटे कणखर आतून मात्र मऊ लोण्यासारखे 
मुखवटे सुंदर गोजिरे प्रत्यक्षात विक्षिप्त काजळलेले 
असंख्य लोक फिरतात लावून बेधडक हे मुखवटे 
अन करतात खोट्याचे खरे अन खऱ्याचे खोटे 
खोट बोलण सोप्प अन स्वाभाविकच 
पण मनाशी प्रामाणिक असण तितकच महत्वाच 
कोणत्याही कारणासाठी जगासमोर कितीही मिरवले 
तरी स्वतःशी मात्र प्रामाणिकच असलेले 
असेच मुखवटे 'किमया' करतात 
माणूस म्हणून योग्य न्याय देतात 
- तेजश्री

Saturday, January 1, 2011

सूर

सप्तसुरांच्या वाटेवरला एक सूर बिनसला
नृत्यामधला एक बोलच हरवून गेला 
चित्र रेखाटताना अचूकशी छटा गवसेना 
रांगोळीतली रेघ काहीकेल्या सरळ येईना 
भरतकामातला कशिदा आज काही जमेना 
कवितेतल यमक अजिबातच जुळेना 
निसर्गाच्या सानिध्यात मन माझ रमेना 
स्वयंपाकात रस असून जेवण रसदार होईना 
कलेशिवाय जीवनाचा सूर कसा पकडायचा 
कलेशिवाय हा जीव कसा अन कुठे रमवायचा? 
- तेजश्री