Thursday, October 13, 2011

पाऊस पडून गेल्यावर


पाऊस पडून गेल्यावर, तरतरली तृणपात 
झटकून दिली साचलेल्या मरगळीची कात 

पाऊस पडून गेल्यावर, कपाशी ढगाचा थाट 
सुवर्णकिरीट धारी मेघाची आगळीच  बात 

पाऊस पडून गेल्यावर, मृदगंध गेला गगनात 
गगनाच्या सजावटीला उधळले रंग सात 

पाऊस पडून गेल्यावर, चिंबलेली पाऊलवाट 
गाठू पाहते खुळी पावसाला पुन्हा क्षितिजात 

पाऊस पडून गेल्यावर, संपत आलेली रात 
रंगली ती हौशी सांडेतो चांदणे अंगणात 

पाऊस पडून गेल्यावर, पक्ष्यांचा किलबिलाट 
आळवती सप्त स्वर, साठवले थेंबाथेंबात  

पाऊस पडून गेल्यावर, आठवणींच्या गर्तात 
गढून गेलेली एक मुग्ध, सात्विक पहाट 


तेजश्री
१४.१0.२०११ 

No comments:

Post a Comment