Thursday, December 26, 2013

आभाळ उसवलेले



झेपावला जरीही 
पंख फाटलेले 
जपली अस्मिता तरी 
आभाळ उसवलेले 

दिशा शोधत गेला 
परी रस्ता हरवलेले 
डोळ्यातल्या स्वप्नात 
मार्ग चुकलेले 

दाटले बळ पायात
तरी बेडीत अडकलेले 
जागृत आकांक्षांचे 
ध्येयज्योत विझलेले 

तेजश्री 
२७.१२.२०१३

Tuesday, November 12, 2013

देऊळ


नदीपल्याड 
देऊळ उभे
कळस त्याचा 
उंचुंच नभे 

होई अभिषेक 
सोनसळी 
नाहिलेली 
विठू रखुमाई 

भक्तांची रांग 
दूरवर राहे  
धुक्यात विरले 
तुकोबाचे दोहे 

एक झाला 
अवघा रंग 
निनादला 
टाळ मृदुंग 

तेजश्री 
१३.११.२०१३

Tuesday, September 24, 2013

तू


वार्यावरती गंध पसरे 
अन अलगद उमले कळी 
समोर तू असतो जेव्हा 
खुलते गालावर खळी 

स्वप्नांचे वाहती वारे
अन आकांक्षांचे तरंग उठे 
भोवताली तू असतो जेव्हा 
समाधान नयनी साठे 

डोलणाऱ्या गवता संगे 
आनंद होई दवबिंदू 
निकटी तू असतो जेव्हा 
सागरास मिळते सिंधू 

थेंब टपोरे टपटपती   
अन आभाळ होई श्रावण 
समीप तू असतो जेव्हा 
वाजते अंतरी प्रेम-धून 

तेजश्री 
२४.०९.२०१३

Friday, August 23, 2013

चुकामुक



काय आता किती वाट बघायची ?
कंटाळा आलाय मला, 
अस वाटेकडे डोळे लावून बसायचा 
म्हणजे अगदी ठरवून 'चुकामुक'च होते 
म्हणजे इतकी वाट बघून 
भेट नाहीच होत न 
म परत वाट बघायची 
पुन्हा एकदा नवीन आशा घेऊन 
पुन्हा वाटेला डोळे लावून 
म जेव्हा तू भेटशील ती वेळ जवळ येते 
मोहरून अंग क्षणोक्षणी जाते 
तू येतच नाहीस 
म, दमून जाते मी वाट बघून 
थकून जाते शरीर वाटेला डोळे लावून 
आणि डोळ्याला लागतो डोळा क्षणासाठी 
आणि हरवून बसते मी तुला कायमचीच 
चुकामुक ह्यावेळी जन्माचीच ……… 

तेजश्री 

Monday, July 8, 2013

काय कराव आता?


काय कराव आता?

भिजलीये मी तुझा आठवणीत
मला खूप बोलायचंय तुझ्याशी
खेळायचं मला तुझ्या शब्दांशी
आणि आणि टेकायचय डोक तुझ्या खांद्यावर
पण मला तू मिळताच नाहीयेस
तुझ्याकडे मात्र अज्जीबातच वेळ नाहीये
काय कराव आता ?

पुन्हा चढायचाय डोंगर एका दमात
पुन्हा पोहायचं बेधुंद तलावात
पुन्हा चोरायच्यात गाभूळलेल्या चिंचा
पुन्हा वेचायचं सडा प्राजक्ताचा
पण हे करायला सोबतच नाहीये
तुझ्याकडे मात्र अजिबातच वेळ नाहीये
काय कराव आता?
 
पुन्हा चढवायच्या आहेत तुझ्यावर भेंड्या
पुन्हा खेळायच्या आहेत सागरगोट्या
पुन्हा पायचाय चहा तुझ्यातालाच अर्धा
पुन्हा दाखवायचा आहे तुटणारा तारा
पण तुझ्याकडे मात्र अजिबातच वेळ नाहीये
काय कराव आता?

पुन्हा उडवायचाय पतंग एकदा
ढोल ताशावर नाचायचं पुन्हांदा
पुन्हा भटकायचं तुझ्याबरोबर जंगलात
उकरून दाखवायचाय तुळशीतला दात
पण तुझ्याकडे मात्र अजिबातच वेळ नाहीये
काय कराव आता?

पुन्हा जमवायच्या आहेत रंगीत काचा
पुन्हा बांधायचा आहे बंगला पत्त्यांचा
पुन्हा द्यायचाय तुला घास लाडवातला
पुन्हा पकडायचाय पैसा पावसातला
पण तुझ्याकडे मात्र अजिबातच वेळ नाहीये
काय कराव आता?


तेजश्री
०९.०७.२०१३

Sunday, June 23, 2013

आठवण

वारा बोचणारा सुटला, आणि निसरडी झाली वाट
आठवण काढण्यासाठीच तुझी, जणू येते रोज रात

गंध दाटे नभात तुझ्या सहवासाचा
आज मात्र एक एक क्षण, विरहात काढण्याचा

द्वंद्व तुझ्या-माझ्यात उगाच लटके
शब्द मात्र काढती एकमेकांचे लचके

मग पाठोपाठ पुन्हा, जातात एकामागून एक राती
झोप उडून नयनांची, ओली मात्र होते उशी

किती प्रेम, किती विश्वास किती अपेक्षा आणि किती श्वास
अडकले एकमेकांत म्हणून तर रोखून धरतात प्राण बास !

तेजश्री
२३.६.२०१३

Tuesday, June 4, 2013

पाऊस


एक टपोरा थेंब टपकन गाली पडला 
हुळहुळत खाली जाता शहारा आला 

थेंबान मागून दबकत पाऊस आला 
हळुवार माझ्या कानात  कुजबुजला  

देतेस मला साथ डोंगरापर्यंत 
सहप्रवासात असेल गंमत

अपोआप पावले डोंगराकडे वळली 
पावसाच्या साथीने वाट चिंब झाली 

पाऊस उमदा सार्यांशी नाते जपत होता 
प्रेमाच्या सरीत सार्यांना भिजवत होता 

छोट्या छोट्या झुडुपांवर लाल पिवळी फुले 
इवले इवले गवत थेंबांना घट्ट बिलगले 

पाऊस नाचत नाचत पुढे पळत होता 
क्षितिजापर्यंत एका दमात जात होता 

पावसात भिजलेली पाउलवाट नववधू भासे 
पाउस तिचा साजण श्वासा श्वासात  हसे

पाऊस मला भिजवू पाहात होता 
भिजवता स्वतःच चिंब भिजत होता 
चिंब भिजलेल्या पावसात रूप न्यार
भिजलेल्याच पावसाच चित्र प्यार

तेजश्री
०५.०६.२०१३

Monday, April 29, 2013

द्वंद्व


चैत्रातल उन्ह वरचा रखरखीत पणा 
उन्हाचा दाह, भरून आलेल्या भावना 

काळ सावळ आकाश त्याचा गंभीर सूर 
बुद्धी आणि भावनांच 'द्वंद्व' नेत दूर दूर 

अंगाची लाही लाही वर घामाची धार 
भावनांना मारणारे निशब्द विचार 

एकात एक अडकलेल्या मेघमाला लडिवाळ 
चाफ्याच झाड त्यावर फुल लाल लाल 

धरतीला भिडणारं क्षितिजावरच आकाश 
जखडून ठेवणार काही अबोल पाश 


तेजश्री 
३०.०४.२०१३ 

Friday, April 26, 2013

चांदण



शुभ्र टपोऱ्या चांदण्याचा ध्यास 
संगे विरघळलेला जाईचा  श्वास 

धुंद बेधुंद गार गार वारा
नयनी वसल्या प्रेमधारा 

एक फुललेल झाड फांद्या गुंफलेल 
चांदण खात स्तब्ध  थांबलेल 

चांदण्यात रमताना वेळ सरूच नये 
गुंफलेल्या फांद्या कधी सुटूच नये 

तेजश्री 
२७.०४.२०१३ 

Thursday, April 18, 2013

काळोख साचलेला ……


काळोख साचलेला 
चांदव्याचा शुभ्र सडा 
गार गार झुळूक 
ऋतूचा सांडे घडा 

नजर तुझी अशी 
विसर पडे माझा मला 
शब्दांच्या भूलभूलय्यात 
हरवले मी अर्थाला 

नात्याची उलगडे कुपी 
गंध दरवळला  
अलगद पिसापरी 
स्पर्शून गेला मनाला 



तेजश्री 
१९.०४.२०१३  

चंद्राची लाट … लाटेतला चंद्र


चंद्र गोल तो नितळ स्वच्छ 
अधीर आणि अस्थिर झाला 
प्रतिबिंब पाहण्या लाटेमधले 
स्पर्शण्याचा यत्न केला 

मोहाची जरी मिठी न तुटली 
तुटू लागला विश्वास सगळा 
श्वासासंगे प्रतिबिंब  हलले
तडा गेला अस्तित्वाला 

लाटेचे ते सत्व संपले 
विझल्या नभीच्या चांदण्या 
झटापटीतून द्वंद उपजले 
घोर लागला सबंध जगण्या 

चंद्राच्या मनीचे तरंग सच्चे 
लाटेत उमटण्या झटे खुळा   
लाट अनामिक दूरवर पोहचे 
अंतर तोडले पंधरवड्याला 
     
लाटेत उमटेल का चंद्र 
न जाणो भविष्याला 
अस्थिर क्षण आला- गेला 
कोरले चित्र जीवनाला  


तेजश्री 
१०.४.१३ 

Friday, March 22, 2013

हसू लागली…………


रात्रीच्या घन अंधारातून सलामत निघाली 

अन मुग्ध सकाळ निखळ हसू लागली 



जन्मभर तेवली ती ज्योत बनून साधी 

विझताना मात्र समाधनानं हसू लागली 



भिरभिर फिरली नाना फुलांच्या भोवती 

अखेरी कृष्णकमळास बिलगून हसू लागली 



विठू माउलीच्या ध्यासान शेकडो मैल चालली 

अखेरीस मात्र नेत्र दर्शनानेही हसू लागली 

तेजश्री 

२२.०३.२०१३   

Tuesday, March 12, 2013

उमगणाऱ्या भावना





मला कळतात 
तुझे अबोल शब्दार्थ 
मला कळतात 
तुझ्या भावना अव्यक्त 

मला जाणवते 
उब तुझ्या हातातली 
मला जाणवतात 
स्वप्ने तुझ्या नेत्रातली  

मला आवडतो 
गंध सहवासानंतर दरवळणारा 
मला आवडतो 
भाव तुझ्या हृदयातला 

मला भावते 
मूर्ती तुझी पाषाणाची 
मला भावते 
गोडी तुझी अमृताची 

तेजश्री 
१२.०३.१३   

Wednesday, March 6, 2013

सावली




उन्हे प्राचीची कोवळी 
तुझ्या माथी रेंगाळली 
स्वप्नपालवी फुटली 
विचारात झुलली 

पारंबी खोल गेली 
निर-आशेने गुंतली 
सहज ती विस्तारली 
तग धरून राहीली

एक इच्छा वसली 
पाउल पडावे पाउली 
रूप तुझेच धाकुली 
बनून रहावी सावली 

तेजश्री 
०६.०३.१३      

Friday, March 1, 2013

भाव-तरंग


गहिवरला बावरला 
शब्द मनीचा कुठला ?
थरथरला बिथरला 
थेंब पिसाचा इवला 

शुभ्र पंख हे पसरले 
पाण्यात धुंद पहुडले 
पाण्यात राहूनही 
एकरूप न झाले 

स्वर सतारीतून आला 
मनतरंग झंकारून गेला 
झंकारल्या तारेला 
स्थिर न करू शकला 

पाण्यावरल्या नक्षीला 
बंध वाऱ्याचा बसला 
सुंदर जरी तो दिसला 
पाण्याला लगाम वाटला 

तेजश्री 
०२.०३ २०१३         
 

Tuesday, February 19, 2013

जमीन



आक्रंदली  'ती' 
dry soil broken in black and white Stock Photo - 11977874अन भेगाळल्या  जखमा 
नुरे सुखाश्रू  
आघात बसे वर्मा 

दूरवर  पसरली
एकच दुखाःची लकेर 
अटून जल गेले 
सारे पोटातले अखेर 

छिन विच्छिन्न पडलेली
तिची काळीभोर  काया 
पावसाने लावले 
तिला कैक दिस तरसाया 

रुसली 'ती' की 
रुसला पाउस न कळे 
नाळ जोडली पावसाशी 
ठरवूनही न तुटे 

उपजला त्यातूनच 
दुष्काळ तान्हुला 
कलेकलेने मोठ्ठा 
होतच राहीला  

वरून सूर्याची 
न झेपणारी टीकास्त्रे 
घायाळ करी तिला 
तीव्र उन्हाचे चटके 


आक्रोशली  'ती' 
झेलल्या वेदना 
पोहचल्या पावसाशी 
तरी न फुटे पान्हा 


तेजश्री
१९.०२.२०१३ 

Wednesday, February 6, 2013

भेट


भेट तुझी माझी होती सहजच जमलेली 
आठवण पिसांवर अलगद स्वार झालेली 

आठवणींचे मोती  येत होते ओठातून 
जपून ठेवू त्यांना क्षणांच्या शिंपल्यातून 

आठव ना ते दिवस वाऱ्याशी गप्पा मारलेले  
भेटीत मात्र शालीमध्ये गुपचूप बांधून आणलेले 

तू भेटली की फार फार छान वाटायचं 
तरंगत अलगद परीच्या राज्यात सोडायचं 

तुझ्याशी बोललेले चार शब्द अगदीच मनचकोर 
मन तुझ्याशी मोकळ करताना आरसाच जणू समोर 

सांगूनही खोट वाटेल एकेकाळी पान नव्हत हलत 
आज मात्र बसलोय आठवणींच्या जगात भटकत?


तेजश्री 
०७.०२.२०१३

Friday, February 1, 2013

प्रसंग




पुलावर बसले होते राजा आणि राणी 
पुलाखालून वाहून गेले बरेचसे पाणी 

आता मात्र नदी झाली होती शांत 
पाचोळा गेला वाहून जीवन विश्रांत 

भाव झरले नेत्रातून अनेकदा ह्या आधी 
आज मात्र सारे बोले हस्तमिठी साधी 

झाड उभ होत पोक्त हात नम्र जोडून 
सुचवत होत पुढली वाट एकमेकांना सोडून 

राजा तो होता श्रीमंत आटपाट नगराचा 
पण तरी होणार नव्हता कधी त्या राणीचा 

आजची भेट वाटलेलं, चित्र करेल भंग  
रास रंगात भिजलेले जागवेल प्रसंग 

घडवायचे नियतीला मात्र उलटे होते 
बंधनातही प्रेम जगवायचे होते 

निखळ प्रेमाच उमटलं बिंब जळात 
सृष्टी नाहिली राजा-राणीच्या प्रेमात 

तेजश्री 
०१.०२.२०१३ 

Saturday, January 26, 2013

ठरवले आज होते ....



ठरवले आज होते 
स्वर सतारीतून काढायचे 
धुंद मनाला करण्या 
आज तिला विनवायाचे 

ठरवले आज होते 
फुलपाखरा सांगायचे 
फुलाची समजूत काढण्या 
आज त्याला मनवायाचे 

ठरवले आज होते 
नदीला वाहते करायचे 
काही अडकले काढण्या 
आज तिला हसवायचे 

ठरवले आज होते 
घुंगराच्या बोलात रमायचे 
तालाच्या संगतीत 
राधेला कृष्णाशी मिळवायचे 

ठरवले आज होते 
चंद्राला खुदकन हसवायचे 
चांदणी संगे फिरण्या 
आज त्याला सोडायचे 

ठरवले आज होते 
आठवणींना न थांबावयाचे 
अडकले शब्द जे जे
आज तुझ्यापुढे उघडायचे 


तेजश्री 
२६.०१.२०१३




Saturday, January 19, 2013

चुकून प्रेमात पडशील...


रात्रीच्या अंधाराची शाल 
शालीवर चमचमणारे  तारे 
बघशील आणि चुकून प्रेमात पडशील... 

शुभ्र गार गार जाई  
त्यावर गंधाळणारे दवबिंदू 
हुंगशील आणि चुकून प्रेमात पडशील ...

निवांत हलका वारा 
आठवणींच मोरपीस 
आठवशील आणि चुकून प्रेमात पडशील...

अथांग पसरलेला सागर 
त्यातून उगवत केशरी बिंब 
बघशील आणि चुकून प्रेमात पडशील..

लांबवर जाणारी ओली पाउलवाट
उघड्या माळरानावरचा चिंब पाऊस 
भिजशील आणि चुकून प्रेमात पडशील...

दूरवरून ऐकू येणारा पावा 
आणि मीरेची एकतारी 
ऐकशील आणि चुकून प्रेमात पडशील...

येईल 'ती' समोर जुन्याच रुपात 
नव्याने बघशील स्वतःच प्रतिबिंब 
बघशील आणि चुकून प्रेमात पडशील.... 
 
तेजश्री 
१९.०१.२०१३ 
  

Thursday, January 10, 2013

शब्द


शब्द लाजरे बुजरे आज जळात न्हाले 
आठवणींनच्या पदराला नकळत ओले केले 
आधार तुझा होता जेव्हा मला उमगले 
नकळत उमलून कळीचे, टपोरे फुल झाले 
शब्दांना सावरलेल्या त्या मायेच्या थापेचा 
आवेग क्षणांना विश्वास दाखवलेला 
कोठ्न आणलास 'शब्द' इतुका धैर्याचा 
मला बापडीला का तोच तोकडा?
मोडून टाक ती रेष आखली तुझ्या माझ्याती 
शब्दांना राहूदे अबोल सहवासा अंती 

तेजश्री 
११.०१.२०१३