एक टपोरा थेंब टपकन गाली पडला
हुळहुळत खाली जाता शहारा आला
थेंबान मागून दबकत पाऊस आला
हळुवार माझ्या कानात कुजबुजला
देतेस मला साथ डोंगरापर्यंत
सहप्रवासात असेल गंमत
अपोआप पावले डोंगराकडे वळली
पावसाच्या साथीने वाट चिंब झाली
पाऊस उमदा सार्यांशी नाते जपत होता
प्रेमाच्या सरीत सार्यांना भिजवत होता
छोट्या छोट्या झुडुपांवर लाल पिवळी फुले
इवले इवले गवत थेंबांना घट्ट बिलगले
पाऊस नाचत नाचत पुढे पळत होता
क्षितिजापर्यंत एका दमात जात होता
पावसात भिजलेली पाउलवाट नववधू भासे
पाउस तिचा साजण श्वासा श्वासात हसे
पाऊस मला भिजवू पाहात होता
भिजवता स्वतःच चिंब भिजत होता
तेजश्री
No comments:
Post a Comment