Sunday, December 23, 2012

चुकलच जरा तुला गृहीत धरल


पाउस  पडत होता धुवाधार 
वाऱ्यान थैमान घातलेल 
छत्रीत सामावून घेशील वाटल 
चुकलच जरा, तुला गृहीत धरल 

दोष माझा नव्हता तुलाही माहिते
समजून घेशील वाटल, खुळ्यासारख 
प्रेमान आपलस करशील वाटल 
चुकलच जरा, तुला गृहीत धरल 

तुझ्यासारखं नाही वागता येत 
माहित आहे तुलाही 
चुकताना सांभाळून घेशील वाटल 
चुकलच जरा, तुला गृहीत धरल 

काटा रुतला होता पायात 
जखम सलत होती 
हळूच काढशील वाटलेलं 
चुकलच जरा, तुला गृहीत धरल 

समोर काळोख दिसत होता 
तू प्रकाश दिलास, ऋणी राहीन  
शेवटपर्यंत दावशील तेज अस वाटलेलं  
चुकलच जरा तुला गृहीत धरल 



तेजश्री 
२४.१२.२०१२ 

Friday, November 23, 2012

लेखणी




लेखणी मी अद्याप हाती धरली नाही 
शब्द मोजके अर्थ उपरा वाटणार नाही 

लेखणी बोलताना अश्रू ढळणार नाही 
भाव सच्चा विश्वास कचरा होणार नाही 

लेखणीचे प्रेम, भक्ती, देश बोल जाणणे नाही
लेखणीची निर्मल भाषा चरा मात्र काढणार नाही

लेखणीचे शब्द असे भविष्यात विरणार नाही 
न जाणो भावनेचा झरा पुन्हा वाहणार नाही 

लेखणीचे बंध मला पुन्हा झेपणार नाही 
बोलेल तेव्हा मन कोपराकोरा ठेवणार नाही 


तेजश्री 
२३.११.२०१२

Monday, November 19, 2012

रेष




तुझ्या माझ्यात आपण एक रेषा आखली तर 
परिस्थितीने ती उल्लंघाया भाग पाडले तर ?

पाळताना बंधने, बंध मी तुला  नाही घालणार
मात्र चंद्राने चांदणीला नजरकैद केले तर? 

मी तुला माझा हो अस कधी नाही म्हणणार  
समोर तू आल्यावर भाव नेत्रातून झरले तर ?

नाही कळून देणार नाते अपुल्या मधले 
मात्र निकटी तू येता नजर फितूर झाली तर 

व्यथा, संकटांची चिखल फेक चालूच असणार 
त्यातही सुखाची निल कमले फुलली तर? 


तेजश्री 
१९.११.२०१२ 

Friday, October 19, 2012

अपेक्षा


माझ्याविषयी तुझ्या अपेक्षा आहेत खुप
शब्द नाही तरी डोळे बोलून जातात गुपचूप 

इच्छा तुझी अशी असंण नाही नवल मजला  
सगळीकडे पुरे पडण कठीण आहे मला 

अपूर पडायला परीस्थितीही कारणीभूत 
विजोड भावनेचे कसे जोडावे सुत ?

निर्णय म घ्यावे लागतात प्रसंग पाहून 
नाराज होऊ नको मत तुझ डावलल म्हणून

अस वाटतंय कि अचानक आभाळ भरून आलय
अपेक्षेच्या ओझ्याखाली हिरव अस्तर फाटलंय  

आणि अचानक शब्द खुंटलेत, अर्थ सापडत नाहीयेत 
माझ्या डोळ्यातले अपराधी भाव तुला उमगत नाहीयेत   


तेजश्री 
१९.१०.२०१२ 

Monday, October 8, 2012

खडक


अथांग पसरलेला समुद्र 
क्षितिजापर्यंत दूरदूर 
त्याच्या कुशीत विसावला 
भलामोठा खडक काळाकाळा
समुद्राच्या लाटा आदळल्या 
क्रोर्यपणे फेसाळल्या 
आपटल्या खडकावर 
पण तो अचल स्थिर 
नाही हलला ध्येयापासून 
झाल्या जखमा लाटेतून 
जसा लाटांचा जोर वाढला   
त्या आणखी भळभळल्या 
खाऱ्या पाण्यानी डसल
खडकाला देखील रडवलं 
हेतू नव्हता बिचार्याचा 
खडकाला दुखवायचा 
तो तर आधार होता 
सीमा घालणारा होता 
त्याच्याविना सागर 
गेला असता वाहवत  
भला मोठा असूनही 
नमत होता खडकापाशी 
एकमेव होता दैवस्थान 
अख्या जगासमोर नाहीपण 
त्याच्या पुढ नमाव वाटायच   
त्याच्याविना, पान नाही हलायचं 
कशी काढणार समजूत 
विचार झाला पाठवावा दूत 
भेडसावणारी शंका दूर व्हावी
प्रेमाची नाती तशीच टिकावी 

तेजश्री 
०९.१०.२०१२ 

Thursday, August 30, 2012

बरस बरस रे घना ...


पाऊस थेंब भुरभूर 
जिवा लागे हुरहूर
मल्हार नादे दूरदूर 
छेडे तार आत उर 

आठवांचा डोळा पूर
विरहाचा मनी सूर 
नको खुरटू अंकुर 
भावनांना नको चीर 

बोल सख्या रे मोकळे 
आभाळ किती दाटले   
घन दूर दूर थिजले 
ना कश्याने होरपळले 

बरस बरस रे घना
प्रीतीत मज नाहू दे ना 
गारव्यात झुलव ना
गंधात पुन्हा भिजव ना ........

तेजश्री 
३०.०८.२०१२ 

Thursday, July 26, 2012

श्रावण


झंकारली श्रावण धुन 
पावसासंगे सोनेरी उन 

टप टप थेंब पानावरती 
साचले जणू शुभ्र मोती 

ढग खेळती लपाछपी 
धावत कैक अंतर कापी

सरी खेळती पाठशिवणी 
पक्षी गाती गोड गाणी 

मृद्गगंधाची खुले कुपी 
सृष्टी भासे अप्सारारूपी 

इंद्रधनुचा मुगुट डोई  
हिरवीगार झाली भुई 

भिजरी पायवाट नागमोडी 
सरसर जात जंगल तोडी 

श्रावण तर ऋतूंचा राजा 
श्रावणासंगे लुटू  मजा 


तेजश्री 
२७.०६.२०१२ 

Monday, June 18, 2012

चरर्र उमटलेली काळजातली रेघ .....


अचानक दाटून आलेले काळे सावळे मेघ 
चरर्र उमटलेली काळजातली रेघ 
भरून आल उर खुळ्या आठवणींनी 
पाणावले डोळे अन, थपथपली पापणी 
सरकत होते मेघ पुढे मागे 
हुलकावत एखादा मधेच पांगे 
कडाडे म एखादी विदुला 
शिरशिरी येई अंगाला 
आठवणींनी झाली लाही लाही
वाऱ्याची फुंकर रेंगाळे दिशा दाही
वार्याचाही मग वाटे राग 
फुंकरीने पेटून उठली जर आग?
कुठून आणणार बरसणारा मेघ 
चर्रर उमटलेली काळजातली रेघ 
कोंडून गेला प्रकाश सगळा 
श्वास तसा क्षणभर अडकला 
हरवली दिशा हरवली आशा 
खड्यात पडलेल्या कोकराची दशा 
खचला आत्मविश्वास खचली प्रेरणा 
अंधारली पाऊलवाट  ढग काळोखताना 
ठेचकाळली पाऊले जखमा झाल्या 
वेदना सार्या ढगाआड झाकोळल्या 
अचानक दाटून आले मेघ 
चर्रर्र उमटलेली काळजातली रेघ ........

तेजश्री 
१८.०६.२०१२ 

Thursday, May 31, 2012

पहिलीच आठवण ...


पहिलीच आठवण 
पहिलच गीत 
पहिलीच साठवण 
पहिलीच प्रीत 

पहिलाच ऋतू 
पहिलाच पाऊस 
पहिल्याच प्रेमाची 
पहिलीच कूस

पहिल्या पाऊसाचा 
पहिला गंध 
पहिल्या नात्यातला 
पहीलाच बंध 

पहिलीच नजर 
पहिलाच क्षण 
पहिल्याच भेटीतल
पहिलच संभाषण 

पहिलंच प्रेम 
पहिलाच वाद 
पहिलाच रुसवा 
पहिलाच स्वाद 

पहिल्याच नात्याचा 
पहीलाच सण 
पहिल्याच घराचं
पहिलंच अंगण 

पहिल्या पावसानंतरचा 
पहिलाच वारा 
पहिल्याच आठवणींचा 
खेळ  सारा 


तेजश्री 
१.६.१२ 

Saturday, March 10, 2012

सांग माझी आठवण येते का?


लिहित जातोस खुळ्यासारखा
लेखणी अडखळते तिच्यापाशी 
सांग माझी आठवण येते का?
लिहायचे थांबवून उठतोस 
बाहेर पडतोस खुप खुप चालतोस
दोहोबाजुनी झाडे असतात 
झाडात दडलेले पक्षी असतात 
सांग माझी आठवण येते का?
पोहचतोस नदीकिनारी 
बुडणारी नाव दिसते 
किंकाळी कानी पडते 
तुझ अस्तित्व हरवत असत 
सांग माझी आठवण येते का?
किनार्यावर तडफडणारा मासा असतो 
जाळ्यात गुरफटलेला, अस्तित्व संपलेला 
अखेरच्या मदतीच्या धावेचा निष्फळ यत्न
पाहतोस तु, क्षणभरासाठी तरी हळहळतोस 
सांग माझी आठवण येते का?
सारे प्रसंग मागे टाकून तु घरी जातोस
घरी बायको असते 
चहा टाकायला सांगून तु स्नान करतोस
पाण्याबरोबर आठवणींना धुवू पाहतोस 
साचलेल्या पाण्यातरी मी दिसते का?
अंघोळ करून तु बाहेर येतोस 
बायकोच्या हातचा चहा घेतोस 
चहाची सवयीने स्तुती करतोस 
निजायला बिछान्यावर पडतोस 
झोप डोळ्यांना हाकेच्या अंतरावर असते
सांग माझी आठवण येते का?
बायको झोपी जाते 
घरात निरव एकाकी शांतता दाटते 
जाणीव होते तुला एकट असल्याची 
खायला उठते शांतता 
सांग माझी आठवण येते का?
उठतोस म खाडकन 
उडुन जाते झोप डोळ्यावरून 
टेबलापाशी येतोस नेहमीच्या 
बायकोचा फोटो फ्रेम मध्ये असतो 
फ्रेम मध्ये आत अजून एक फोटो असतो
तो फक्त तुलाच माहित असतो
तुला आठवत काहीतरी अंधुकस 
सांग माझी आठवण येते का?
अस्वस्थ होतोस ,
हातात लेखणी धरतोस 
सार मनातल कागदावर 
उतरावयाच ठरवतोस 
अडखळते लेखणी .......
सांग माझी आठवण येते का?

तेजश्री
१०.०३.२०१२ 

Wednesday, February 29, 2012

चित्र


एक झाडं मादक 
फुलांच्या मिठीत 
गुज पक्षाशी करते 
लाडीत गोडीत   

एक केशरी बिंब 
क्षितीज तळी 
उब विश्वाची 
भरते वक्षस्थळी  

उभा डोंगरकडा 
छाती काढून 
निळी शांतता 
अदबीने लवून 


तेजश्री 
२९.०२.२०१२ 

Friday, February 17, 2012

ओळख



ओळख? खूपच चांगली होती
स्वतःहूनही आधी एकमेकांची 
खरतर फार दिवसांची नव्हती
पण साताजन्मांच्या बंधनाची 
ओढ त्यात दडली होती 
नव्याने भेट झाली एकमेकांची 
आत्मा जुना तरी शरीरे नविन होती 
प्रकृती तीच पण स्वभाव भिन्न होते 
ओढ तशीच पण प्रसंग वेगळे होते 
स्वाद होता, लज्जत होती, नजाकत होती 
गम्मत होती, परीक्षा होती, भीतीही होती 
विश्वास होता, पण मानवी बंधन होती 
अंतिम ध्येय ठाऊक होत 
पण पाऊल वाटेत नाविन्य होत 
आजूबाजूला मोहक स्थळ होती 
आकर्षक अशी  नाती होती 
आणि, नेमक नको तेच झालं 
एका सुंदरीची भुरळ त्याला पडली  
'त्या' सुंदरीची त्यानी ओळख करून दिली 
चूरचुरल तिला, खुपलं, घायाळ झालं मन 
उदास झालं,कळेचना कस सामोर जाव 
दुखः वाटलं, आपल प्रेम कळलंच नाही ह्याला?
किती सहज भुलला तो दिखाऊ देखाव्याला
म काहीबाही आठवू लागल बिचारीला 
आपल असेल तर येईल आपल्या जवळ 
खंबीर झाली म, अश्रु दडवून टाकले सहजतेने 
हास्याची लकेर ओढून घेतली चेहऱ्यावर 
स्वागत केल नविन नात्याचं, दोघातल्या तिसर्याच 
दिवस उडत होते, भिरभिरत खुप दूर गेले 
त्या 'सुंदरी' मध्ये जन्माच मावलं नाही समाधान
जाणीव झाली सत्याची त्याला पूर्णपणे 
पण आज खुप उशीर झाला होता स्वतः ला ओळखायला 
तरी धीर केला त्याने आपलस केल तिला 
आणि तिच्या कडे पाहताना त्याला स्वतःचच दिसलं प्रतिबिंब 
नव्याने झाली ओळख स्वतःची, नविन उमलत्या नात्याची  .........


तेजश्री 
१७.०२.२०१२ 

Wednesday, February 8, 2012

गुंता



असं नाहीये मला शब्द सापडत नाहीयेत 
मला परिचयाचे आहेत ते 
मी सगळ स्वच्छ बोलू  शकेनही 
हळव्या भावना सुंदर उलगडेनही 
पण मला तसं  करायचंच नाही 
सार्या गोष्टींना शब्दबद्ध करायचं नाही
कारण बंधन बांधून फक्त व्रण उठतात 
अपेक्षा पूर्ण करण्याच्या दडपणाचे 
बुद्धी गहाण ठेऊन निर्णय घ्यायचाच नाहीये  
भावनांची कदर असावी अशी किमान अपेक्षा 
पुन्हा अपेक्षा, पाठोपाठच दडपण 
नकोच ना ते 'नाते'...न उलगडणार  
काही गोष्टी सहजरित्या समजाव्यात 
भावनिक गुंता हलक्या हाताने सोडवावा 
टोक अधिक ताणल्याने गुंता वाढणार आहे  
मात्र माझ्यापेक्षा कुणीतरी पुढाकाराने तो सोडवावा 
'गरज' वगेरे बोलण्याची ताकद नाहीये 
अर्थ पण तात्कालिक वाटतो 
जीवनातल समाधान मावेल त्यात? 
नाही इतका मोठा तर नक्कीच नाही 
म्हणून जास्त गुंता वाढलाय 
विचारांचा, भावनांचा, अपेक्षांचा ........


तेजश्री
०८.०२.२०१२ 

Friday, January 20, 2012

दोघ


सांजवेळेला नुकत्याच उमलल्या होत्या चांदण्या 
आणि हास्याचे मेघ खुलले होते त्याच्या चेहऱ्यावर 
तिच्या पापण्यांवर मोती सजले होते तृप्ततेचे 
दोघ विसावली होती स्वप्नाळू लाटेवर 
विशाल झाडाच्या फांद्या एकमेकात गुरफटल्या होत्या
पिवळी तांबडी फुल हिरव्या खिडकीतून डोकावत होती
काळ्याभोर विशाल बटांमध्ये गुंतली होती त्याची बोट 
टपोरी माणक सजली होती नाजूक चाफेकळी नाकाखाली 
अन्वय शोधत होते एकमेकांच्या डोळ्यातला 
गवसला अर्थ त्याप्रमाणे समाधान पाझरत होते नेत्रातून 
कोवळ्या लुसलुशीत गवतावर हलकेच फिरत होते हात 
हाताची बोटही एकमेकांत अगदी फांद्यांप्रमाणे गुंतली होती
उष्ण श्वास एकमेकांच्या जवळ आले होते 
फुलपाखरही भिभिरात होती अवतीभवती
नविन अर्थ कळला होता त्या दोघांना 
सहजीवनाचा आर्त स्वर अनुभूत होत होता .....

तेजश्री
२०.०१.२०१२  

Wednesday, January 18, 2012

प्रीती


देहातून पाझरे अतृप्त प्रीती  
न सजता चकाके सोनकांती 

गालावर खुलली लाजेची लाली 
मिलनाची आस सांगे देह बोली 

ओठात रेंगाळे  मंजुळ प्रीतवाणी 
अलगद हालचाल भासे निर्मल पाणी 

बोलायचे होते साचवले जन्मभर 
उद्वेगाला आता कसा घालू आवर 

पाहिली वाट होण्या एक नजर भेट 
जन्म क्षणाचा वाटे पाहिले तुला थेट 

नजर निर्जीव समोर उभा तु जरी
धडधड्त्या हृदयाची मूर्ती संगमरवरी 

न पटली जेव्हा ओळख साताजन्माची
हालली जागा पायाखालील वाळूची  

ढकलला शब्द पड्जीभेत सहजतेने
थरथरणारे ओठ झाकले पदराने

नेत्रातून  पाझरली अतृप्त प्रीती 
न सजता राहिली फक्त आठवणीवरती .......

तेजश्री
१८.०१.२०१२ 

Tuesday, January 3, 2012

कळी


नीळ निरभ्र आकाश 
सोनसळी सूर्यप्रकाश 
नाहू घाले कळीला 
लाल रंग साजे लाजेला 
हिरवा चुडा भरला 
कपाळी मळवट सजला 
उत्कटतेचा गंध दरवळला
प्रीतमच्या वाटे डोळा लागला 
अबोल मुकी कळीराणी  
नेत्रातून कथते प्रेम कहाणी 
उत्सुक बांधण्या रेशीमगाठी   
कधी कधी न सुटण्यासाठी ........

तेजश्री 
०३.०१.२०१२