Sunday, January 30, 2011

सामोरी तू असता


सामोरी तू असता कळी फुलही खुलते 
सामोरी तू असता दव हलकेच उतरते 

सामोरी तू असता विश्वास मरव्याचा दरवळतो 
सामोरी तू असता बाज शब्दांचा सहजवतो  

सामोरी तू असता मंजुळ पावा वाजतो 
सामोरी तू असता हिरवा डोंगर नटतो 

सामोरी तू असता धबधबा कोसळतो 
सामोरी तू असता मल्हार रंगतो 

सामोरी तू असता भानही हरवते 
सामोरी तू असता ओंजळही रिती पडते!

- तेजश्री 

Friday, January 28, 2011

हुरहूर


बोलायचं खुप काही,
सांगायचं अजून काही 
पण आभाळ दाटून आलय 

समजवायचं तुला काही, 
समजून घ्याचय मलाही काही 
पण मन वेड भरून आलय 

समजवायचं जरी काही
शब्दच अपुरे पडता आहेत 
आभाळाला पाणी साठवायला 
ढगच कमी पडता आहेत 

किती बर झालं असत जर 
काही न बोलताही सगळ तुला कळल असत
किती बर झालं असत जर 
काहीच न सांगता सार तुला उमगल असत

मी आधीच बोलणार नाही
बोलले तर अर्जवता नाही 
मला अस म्हणायच नव्हत 
अस शंभरदा म्हणणार 
मनात नसतानाही उगा तुला 
शब्द माझे घायाळ करणार 

शब्दांची जखम भरण्यासाठीही 
कोणते मलम लावणार 
समजूत तुझी काढण्यासाठी 
हुरहूर मनी दाटणार 

शब्दांचे अश्रू गाली हळू खाली आले
मर्यादेची काजळरेष उलंघून ओघळले 
भावनेचा बांध अचानकच तुटला 
डागाळलेला एक ढग भसकन फुटला 

हुरहूर मनात दाटून राहिली 
ह्याची नाही की शब्दांची पुंजी कमी पडली 
पण ह्याची की भावना पोहचवायला प्रीत माझी कमीच पडली.... 

तेजश्री

Monday, January 17, 2011

फुलचुखी

सुंदर साजिरी, गोड गोजिरी फुलचुखी ती खेळत होती 
फुलाफुलांवर रम्य बागडत, मध चोखत ती फिरत होती 

लाल निळे हिरवे पिवळे असंख्य ताटवे फुलांचे पसरले 
इकडे धाऊ की तिकडे धाऊ मन वेडीचे गोंधळून गेले 

रंग चकाकती रोज खुणावती अल्लड मन ते खेचून घेती 
पराग कण जे वाहूननेण्या माध्यम तिचे ते करून घेती 

वास दरवळे जिकडे तिकडे आकर्षण ते सदाच वाटे 
ओढ त्या गंधाची इतुकी की आपोआप पाऊल अडते 

भिरभिर भिंगरी पाया बांधली, अस्थिर मन अखंड फिरले 
जीव इवला असूनदेखील पंख फडफडताना मन ना कचरले 

उत्साही अशी फुलचुखी मनसोक्त जेव्हा खेळे 
मन माझेदेखील लहानाहून लहान झाले 

तेजश्री 

Sunday, January 16, 2011

तू

तुझा एक कटाक्ष, खिळलेला विश्वास 
तुझा एक गंध, दरवळलेली आस
तुझा एक स्पर्श, मिलनाचा ध्यास 
तुझा एक शब्द, प्रेमाचा खास 
तुझा एक भास, रोखणारा श्वास  
तुझा एक आधार, जीवनाचा प्रवास 
- तेजश्री 

Thursday, January 13, 2011

नसता निकटी तू

नसता निकटी तू जेव्हा जीव हा हुरहुरतो 
शब्द दाटुनी येती अन अर्थ वेगळा वाटतो 

अश्रू डोळ्यात दोन ह्या हलकेच उमटती 
तुझ्यावरल्या प्रितीची शाश्वती देऊनी जाती 

विचार तुझेच सख्या रे श्वासाश्वासात अडकले 
लावती जीवाला घोर मन वेडे का गुंतले 

बचैन करते उत्कट ओढ तुझी ह्या मनी 
नाजूक नात्याची जवळीक स्फुंदते नयनी 

भास तुझा अन श्वास तुझा अखंड दरवळतो 
नसता निकटी तू जेव्हा जीव हा हुरहुरतो !!!!!!

तेजश्री 

Wednesday, January 12, 2011

न उलगडणारी कोडी...

आयुष्यातली कोडी सुटणार कधी?
एक सुटता दुसरी राहणारच का उभी?

अचानक एकदम समोर येऊन उभी का ठाकतात 
अपेक्षित पण नसलेले सवाल कसे उठवतात?

कशी उत्तर सापडणार कशी सापडवणार 
नियतीच्या मनातल कधी उमगणार?

करायला जाव एक आणि होणार मात्र भलतच
एकात एक अडकलेल लांबलचक जाळ  

कुठे लांबवर सुरु झालं, कुठवर पसरलं?
एकात एक अस ते कस आणि कधी गुंफल?

आपल्या इच्छांचे आपणच नाही धनी?
पत्ताच लागत नाही नियतीच्या काय मनी?

जीवन म्हणजे आहे नक्कीच एक औत्सुक्य 
समाधानी तरी असेल का उलगडतना ते रहस्य?

कसा आणि कुठे ह्याचा शेवट होणार 
भविष्याचा थांगपत्ता कसा लागणार 

अस म्हणतात भविष्यातल्या गोष्टींची लागते कधीकधी चुणूक 
तर मग मनापेक्षा बुद्धीला अधिक कौल देण्याची करायची का चूक?

काय चूक काय बरोबर कस बर ठरवणार 
सत्यता पडताळण्यासाठी कोणती परीक्षा घेणार 

जीवन म्हणजे भूलभुलय्या केवढा मोठा 
सुटला नाहीतर भावनांचा केवढा तो गुंता 

अक्रोशणाऱ्या मनाला कस अन कुठवर समजवायचं 
बेभान विचारांना कस बद्ध करायचं 

जीवनातल्या वाटेवरले काटेरी प्रश्न हजार 
रक्तबंबाळ होऊन थिजलेले असंख्य विचार 

एकच आशा वाटते मला आता 
आजच्या कोड्याचा उद्या तरी लागुदेत पत्ता 

ह्या प्रश्नांना सध्यातरी पूर्णविराम द्यावासा वाटतो 
नियतीचा प्रश्न नियतीलाच सोडवावयास द्यावासा वाटतो!

तेजश्री 

Thursday, January 6, 2011

मुखवटे

मुखवटे हसरे रडू मनात दाबलेले 
मुखवटे प्रसन्न वास्तवात कोमेजलेले 
मुखवटे शूरवीर प्रत्यक्षात खूप बिथरलेले 
मुखवटे समजूतदार खरतर शंकांनी दाटलेले 
मुखवटे कणखर आतून मात्र मऊ लोण्यासारखे 
मुखवटे सुंदर गोजिरे प्रत्यक्षात विक्षिप्त काजळलेले 
असंख्य लोक फिरतात लावून बेधडक हे मुखवटे 
अन करतात खोट्याचे खरे अन खऱ्याचे खोटे 
खोट बोलण सोप्प अन स्वाभाविकच 
पण मनाशी प्रामाणिक असण तितकच महत्वाच 
कोणत्याही कारणासाठी जगासमोर कितीही मिरवले 
तरी स्वतःशी मात्र प्रामाणिकच असलेले 
असेच मुखवटे 'किमया' करतात 
माणूस म्हणून योग्य न्याय देतात 
- तेजश्री

Saturday, January 1, 2011

सूर

सप्तसुरांच्या वाटेवरला एक सूर बिनसला
नृत्यामधला एक बोलच हरवून गेला 
चित्र रेखाटताना अचूकशी छटा गवसेना 
रांगोळीतली रेघ काहीकेल्या सरळ येईना 
भरतकामातला कशिदा आज काही जमेना 
कवितेतल यमक अजिबातच जुळेना 
निसर्गाच्या सानिध्यात मन माझ रमेना 
स्वयंपाकात रस असून जेवण रसदार होईना 
कलेशिवाय जीवनाचा सूर कसा पकडायचा 
कलेशिवाय हा जीव कसा अन कुठे रमवायचा? 
- तेजश्री