Thursday, October 13, 2011

पाऊस पडून गेल्यावर


पाऊस पडून गेल्यावर, तरतरली तृणपात 
झटकून दिली साचलेल्या मरगळीची कात 

पाऊस पडून गेल्यावर, कपाशी ढगाचा थाट 
सुवर्णकिरीट धारी मेघाची आगळीच  बात 

पाऊस पडून गेल्यावर, मृदगंध गेला गगनात 
गगनाच्या सजावटीला उधळले रंग सात 

पाऊस पडून गेल्यावर, चिंबलेली पाऊलवाट 
गाठू पाहते खुळी पावसाला पुन्हा क्षितिजात 

पाऊस पडून गेल्यावर, संपत आलेली रात 
रंगली ती हौशी सांडेतो चांदणे अंगणात 

पाऊस पडून गेल्यावर, पक्ष्यांचा किलबिलाट 
आळवती सप्त स्वर, साठवले थेंबाथेंबात  

पाऊस पडून गेल्यावर, आठवणींच्या गर्तात 
गढून गेलेली एक मुग्ध, सात्विक पहाट 


तेजश्री
१४.१0.२०११ 

Tuesday, October 4, 2011

शब्द


अनाहूत शब्दाला कुठली किनार भावनेची  
दाटलेल्या पाण्याला पकड काजळ रेषेची 

कधी सहज शब्द बरेच काही बोलून जाती 
बोचणाऱ्या अर्थाची त्यांना नसते भीती 

अश्रूंनी काजळरेष तोडल्याची नाही तमा साधी  
काळा डाग लागला तरी नाही वाटत अपराधी 

वारंवार काढली खपली तर जखमा भळभळती 
नकळतचे घाव ठेवी व्रण कायमचाच मनावरती 

शब्द असे सामर्थ्य भात्यामधला अंतिम शर 
घोट नरडीचा घेई  सुटला इच्छा डावलून जर 

जपून वापरावे असे हे शस्त्र खात्रीचे आहे जरी 
दुःख देण्यास पुरे आहे काट्याएवढे लहानगे तरी 

तेजश्री 
३.१०.२०११ 

Saturday, October 1, 2011

पाऊसाची मिठी

आज माझ्या अंगणी 
पाऊस आला होता 
तुझ्या नसण्याची 
कमी पूर्ण करायला 

पावसाची मिठी 
तितकीच आश्वासक 
अगदी तुझ्या मिठीची 
आठवण करून द्यायला 

घट्ट छातीपाशी धरत 
त्यानी माझे ठोके ऐकले
अगदी हुबेहूब तसेच 
जसे तुच  ऐकायला 

त्यानी स्वतःत सामावून 
घेतले डोळा पाणी 
स्व अस्तित्व लावले
संपूर्ण विसरायला 

पाऊस माझ्या पदराशी 
चाळे करत होता 
अगदी तसाच जणू 
तु लहानांगत खेळायला 
 
पाउसातला पाऊस आज 
राहिला नव्हता 
जसा तु माझ्याहून 
नाहीसच वेगळा 

तेजश्री
०१.१०.२०११