Friday, March 22, 2013

हसू लागली…………


रात्रीच्या घन अंधारातून सलामत निघाली 

अन मुग्ध सकाळ निखळ हसू लागली 



जन्मभर तेवली ती ज्योत बनून साधी 

विझताना मात्र समाधनानं हसू लागली 



भिरभिर फिरली नाना फुलांच्या भोवती 

अखेरी कृष्णकमळास बिलगून हसू लागली 



विठू माउलीच्या ध्यासान शेकडो मैल चालली 

अखेरीस मात्र नेत्र दर्शनानेही हसू लागली 

तेजश्री 

२२.०३.२०१३   

Tuesday, March 12, 2013

उमगणाऱ्या भावना





मला कळतात 
तुझे अबोल शब्दार्थ 
मला कळतात 
तुझ्या भावना अव्यक्त 

मला जाणवते 
उब तुझ्या हातातली 
मला जाणवतात 
स्वप्ने तुझ्या नेत्रातली  

मला आवडतो 
गंध सहवासानंतर दरवळणारा 
मला आवडतो 
भाव तुझ्या हृदयातला 

मला भावते 
मूर्ती तुझी पाषाणाची 
मला भावते 
गोडी तुझी अमृताची 

तेजश्री 
१२.०३.१३   

Wednesday, March 6, 2013

सावली




उन्हे प्राचीची कोवळी 
तुझ्या माथी रेंगाळली 
स्वप्नपालवी फुटली 
विचारात झुलली 

पारंबी खोल गेली 
निर-आशेने गुंतली 
सहज ती विस्तारली 
तग धरून राहीली

एक इच्छा वसली 
पाउल पडावे पाउली 
रूप तुझेच धाकुली 
बनून रहावी सावली 

तेजश्री 
०६.०३.१३      

Friday, March 1, 2013

भाव-तरंग


गहिवरला बावरला 
शब्द मनीचा कुठला ?
थरथरला बिथरला 
थेंब पिसाचा इवला 

शुभ्र पंख हे पसरले 
पाण्यात धुंद पहुडले 
पाण्यात राहूनही 
एकरूप न झाले 

स्वर सतारीतून आला 
मनतरंग झंकारून गेला 
झंकारल्या तारेला 
स्थिर न करू शकला 

पाण्यावरल्या नक्षीला 
बंध वाऱ्याचा बसला 
सुंदर जरी तो दिसला 
पाण्याला लगाम वाटला 

तेजश्री 
०२.०३ २०१३