Saturday, January 26, 2013

ठरवले आज होते ....



ठरवले आज होते 
स्वर सतारीतून काढायचे 
धुंद मनाला करण्या 
आज तिला विनवायाचे 

ठरवले आज होते 
फुलपाखरा सांगायचे 
फुलाची समजूत काढण्या 
आज त्याला मनवायाचे 

ठरवले आज होते 
नदीला वाहते करायचे 
काही अडकले काढण्या 
आज तिला हसवायचे 

ठरवले आज होते 
घुंगराच्या बोलात रमायचे 
तालाच्या संगतीत 
राधेला कृष्णाशी मिळवायचे 

ठरवले आज होते 
चंद्राला खुदकन हसवायचे 
चांदणी संगे फिरण्या 
आज त्याला सोडायचे 

ठरवले आज होते 
आठवणींना न थांबावयाचे 
अडकले शब्द जे जे
आज तुझ्यापुढे उघडायचे 


तेजश्री 
२६.०१.२०१३




Saturday, January 19, 2013

चुकून प्रेमात पडशील...


रात्रीच्या अंधाराची शाल 
शालीवर चमचमणारे  तारे 
बघशील आणि चुकून प्रेमात पडशील... 

शुभ्र गार गार जाई  
त्यावर गंधाळणारे दवबिंदू 
हुंगशील आणि चुकून प्रेमात पडशील ...

निवांत हलका वारा 
आठवणींच मोरपीस 
आठवशील आणि चुकून प्रेमात पडशील...

अथांग पसरलेला सागर 
त्यातून उगवत केशरी बिंब 
बघशील आणि चुकून प्रेमात पडशील..

लांबवर जाणारी ओली पाउलवाट
उघड्या माळरानावरचा चिंब पाऊस 
भिजशील आणि चुकून प्रेमात पडशील...

दूरवरून ऐकू येणारा पावा 
आणि मीरेची एकतारी 
ऐकशील आणि चुकून प्रेमात पडशील...

येईल 'ती' समोर जुन्याच रुपात 
नव्याने बघशील स्वतःच प्रतिबिंब 
बघशील आणि चुकून प्रेमात पडशील.... 
 
तेजश्री 
१९.०१.२०१३ 
  

Thursday, January 10, 2013

शब्द


शब्द लाजरे बुजरे आज जळात न्हाले 
आठवणींनच्या पदराला नकळत ओले केले 
आधार तुझा होता जेव्हा मला उमगले 
नकळत उमलून कळीचे, टपोरे फुल झाले 
शब्दांना सावरलेल्या त्या मायेच्या थापेचा 
आवेग क्षणांना विश्वास दाखवलेला 
कोठ्न आणलास 'शब्द' इतुका धैर्याचा 
मला बापडीला का तोच तोकडा?
मोडून टाक ती रेष आखली तुझ्या माझ्याती 
शब्दांना राहूदे अबोल सहवासा अंती 

तेजश्री 
११.०१.२०१३