Friday, December 16, 2011

शक्य नाही


विसरावे म्हणून विसरणे आता शक्य नाही
सहज जाता जाता नवे बंध बांधणे मान्य नाही 

तुझी आठवण न येत क्षणही जाणे शक्य नाही 
दुसर्या कुणात तुझे प्रतिबिंब पाहणे रुचत नाही 

शिडाचे जहाज होवून वाऱ्यावर झोकणे शक्य नाही 
आठवणींची तुझी सावली, नाकारणे जमणार नाही    

तुटले कितीही तरी चंदन गंध ढाळणे शक्य नाही 
उपर्याने तुझा हक्क नाकारणे आता खपणार नाही 

पाऊस जसा धरेवर न बरसणे शक्य नाही 
तु समोर असताना पाझर न फुटणे शक्य नाही 

विसरावे म्हणून विसरणे आता शक्य नाही
तुझ्या आठवणीनविना जगण्याची कल्पनाही शक्य नाही 

तेजश्री 
१६.१२.२०११ 

Sunday, December 11, 2011

आठवण


रोज रातीला निखळ 
चंद्र येतो जातो 
आठवणींचे नव वादळ 
तेवढ सोडून जातो 

रोज पहाटे तरंग 
अचल पाण्यावर उमटतात 
ते प्रत्येक प्रसंग 
फेर धरत अंगावर येतात 

रोज दिवसा आभाळ 
काळी शाल पांघरून येत
आठवणी भूतकाळ 
होण्याची भीती दाटवून जात 

तेजश्री 
११.१२.२०११ 

Friday, December 9, 2011

प्रायश्चित्त


बेभान सुटलेला बोचरा वारा 
आधीच जगाच्या  बोचत्या  नजरा 
गरज तेव्हा मला होती, तुझ्या आधाराची, 
तुझ्या संरक्षणाची, मायेची, उबेची  
सार विसरण खुप अवघड होत माझ्यासाठी 
भविष्य गाठण्यापायी भूतकाळा टाकणे पाठी 
तुझ्या आधाराची अपेक्षा मी कधी व्यक्त केली नाही 
तु मात्र क्षणोक्षणी दर्शवलीस त्याची खंतही 
पण माझी भूमिका तु नाहीच समजून घेतली  
तुला मी गृहीत धरण्याची फार मोठी चूक केली 
शेवट पर्यंत तुला समजण्यासाठी मी धडपडत होते 
झिजत होते,  क्षणोक्षणी हजारदा पडत होते 
लग्नबंधनात बद्धताना आशा नवल औस्तुक्य होते 
हळुवार उलगडणारे नियतीचे रसाळ कोडे वाटले होते 
संसार एक दलदल, खोल पाय ओढणारी 
खोल खोल गेल्यावरही तोल ढाळणारी 
जून होईतो चविष्ट होणाऱ्या दारूचेही दाखले ऐकले 
अखेर दारूच भिनली, शरीरभर रक्ताचे विष झाले 
आता काळजी नको करू, जगेन मी कशीही, निराधार! 
कारण आता मी गेले आहे जन्म मृत्युच्या पार 
आता समोरचा वणवा पोटात आग पाडतच नाही 
डोळ्यांदेखतचा महासंग्राम घायाळ करतच नाही 
हळवी कळी तु उमलायाच्या आधीच तोडलीस 
आता नियतीच्या शिक्षेच वावग नको वाटून घेउस 
तुझ्या यातना माझ्या हृदयापर्यंत पोहोचतच नाहीत 
निब्बर आतड्याला आणखीन पिळ आता पडतच नाहीत 
तू तुझे निर्णय घ्यायला मोकळा होतास आणि असशील 
प्रायश्चित्ताचे किमान नाटक तर न करशील 

तेजश्री
१०.१२.२०११  

Monday, December 5, 2011

गरज


बिलगून बसलेला दवबिंदू गवताच्या पात्यावर
अगदी घट्ट पकड, मनात दाटलेलं एकच काहूर 

छप्पर गमावण्याच्या भीतीत स्पष्ट तराळलेली नजर 
निरागस, अस्वस्थ मनाची एकसंध अशी थरथर  

धुंद होती जरी हवा, सापडला नाही घोटवलेला सूर 
स्वप्न दुनियेची जरी, शाश्वती नाही येणे बेचैनपुर 

जरी गरज दवालाच एकमार्गी भासे वरचेवर
बिन्दुशिवायचं जीवन जणू मीठ घातलेल क्षीर 

एकमेकांसंगे  भागवण्याचा  गरजेचा निर्धार 
एकमेकांशिवायच मात्र अस्तित्व शून्य निराधार 

हिरव्या हिरव्या गवताचे पाठी हात खंबीर   
प्रेम, विश्वासाची देवाणघेवाण देते एकमेका धीर 

तेजश्री 
५.१२.२०११