Friday, January 20, 2012

दोघ


सांजवेळेला नुकत्याच उमलल्या होत्या चांदण्या 
आणि हास्याचे मेघ खुलले होते त्याच्या चेहऱ्यावर 
तिच्या पापण्यांवर मोती सजले होते तृप्ततेचे 
दोघ विसावली होती स्वप्नाळू लाटेवर 
विशाल झाडाच्या फांद्या एकमेकात गुरफटल्या होत्या
पिवळी तांबडी फुल हिरव्या खिडकीतून डोकावत होती
काळ्याभोर विशाल बटांमध्ये गुंतली होती त्याची बोट 
टपोरी माणक सजली होती नाजूक चाफेकळी नाकाखाली 
अन्वय शोधत होते एकमेकांच्या डोळ्यातला 
गवसला अर्थ त्याप्रमाणे समाधान पाझरत होते नेत्रातून 
कोवळ्या लुसलुशीत गवतावर हलकेच फिरत होते हात 
हाताची बोटही एकमेकांत अगदी फांद्यांप्रमाणे गुंतली होती
उष्ण श्वास एकमेकांच्या जवळ आले होते 
फुलपाखरही भिभिरात होती अवतीभवती
नविन अर्थ कळला होता त्या दोघांना 
सहजीवनाचा आर्त स्वर अनुभूत होत होता .....

तेजश्री
२०.०१.२०१२  

Wednesday, January 18, 2012

प्रीती


देहातून पाझरे अतृप्त प्रीती  
न सजता चकाके सोनकांती 

गालावर खुलली लाजेची लाली 
मिलनाची आस सांगे देह बोली 

ओठात रेंगाळे  मंजुळ प्रीतवाणी 
अलगद हालचाल भासे निर्मल पाणी 

बोलायचे होते साचवले जन्मभर 
उद्वेगाला आता कसा घालू आवर 

पाहिली वाट होण्या एक नजर भेट 
जन्म क्षणाचा वाटे पाहिले तुला थेट 

नजर निर्जीव समोर उभा तु जरी
धडधड्त्या हृदयाची मूर्ती संगमरवरी 

न पटली जेव्हा ओळख साताजन्माची
हालली जागा पायाखालील वाळूची  

ढकलला शब्द पड्जीभेत सहजतेने
थरथरणारे ओठ झाकले पदराने

नेत्रातून  पाझरली अतृप्त प्रीती 
न सजता राहिली फक्त आठवणीवरती .......

तेजश्री
१८.०१.२०१२ 

Tuesday, January 3, 2012

कळी


नीळ निरभ्र आकाश 
सोनसळी सूर्यप्रकाश 
नाहू घाले कळीला 
लाल रंग साजे लाजेला 
हिरवा चुडा भरला 
कपाळी मळवट सजला 
उत्कटतेचा गंध दरवळला
प्रीतमच्या वाटे डोळा लागला 
अबोल मुकी कळीराणी  
नेत्रातून कथते प्रेम कहाणी 
उत्सुक बांधण्या रेशीमगाठी   
कधी कधी न सुटण्यासाठी ........

तेजश्री 
०३.०१.२०१२