Saturday, March 10, 2012

सांग माझी आठवण येते का?


लिहित जातोस खुळ्यासारखा
लेखणी अडखळते तिच्यापाशी 
सांग माझी आठवण येते का?
लिहायचे थांबवून उठतोस 
बाहेर पडतोस खुप खुप चालतोस
दोहोबाजुनी झाडे असतात 
झाडात दडलेले पक्षी असतात 
सांग माझी आठवण येते का?
पोहचतोस नदीकिनारी 
बुडणारी नाव दिसते 
किंकाळी कानी पडते 
तुझ अस्तित्व हरवत असत 
सांग माझी आठवण येते का?
किनार्यावर तडफडणारा मासा असतो 
जाळ्यात गुरफटलेला, अस्तित्व संपलेला 
अखेरच्या मदतीच्या धावेचा निष्फळ यत्न
पाहतोस तु, क्षणभरासाठी तरी हळहळतोस 
सांग माझी आठवण येते का?
सारे प्रसंग मागे टाकून तु घरी जातोस
घरी बायको असते 
चहा टाकायला सांगून तु स्नान करतोस
पाण्याबरोबर आठवणींना धुवू पाहतोस 
साचलेल्या पाण्यातरी मी दिसते का?
अंघोळ करून तु बाहेर येतोस 
बायकोच्या हातचा चहा घेतोस 
चहाची सवयीने स्तुती करतोस 
निजायला बिछान्यावर पडतोस 
झोप डोळ्यांना हाकेच्या अंतरावर असते
सांग माझी आठवण येते का?
बायको झोपी जाते 
घरात निरव एकाकी शांतता दाटते 
जाणीव होते तुला एकट असल्याची 
खायला उठते शांतता 
सांग माझी आठवण येते का?
उठतोस म खाडकन 
उडुन जाते झोप डोळ्यावरून 
टेबलापाशी येतोस नेहमीच्या 
बायकोचा फोटो फ्रेम मध्ये असतो 
फ्रेम मध्ये आत अजून एक फोटो असतो
तो फक्त तुलाच माहित असतो
तुला आठवत काहीतरी अंधुकस 
सांग माझी आठवण येते का?
अस्वस्थ होतोस ,
हातात लेखणी धरतोस 
सार मनातल कागदावर 
उतरावयाच ठरवतोस 
अडखळते लेखणी .......
सांग माझी आठवण येते का?

तेजश्री
१०.०३.२०१२